Friday, September 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीत चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पाच वर्षांचा बालक गंभीर जखमी

रत्नागिरीत चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पाच वर्षांचा बालक गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील डीएसपी बंगल्याजवळ असलेल्या पोलीस लाईन परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संतापजनक घटना घडली. घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकल्यावर तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस लाईन परिसरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासावरून स्थानिक नागरिकांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.

प्रणव राम खेंडेकर (वय ५ वर्षे) असे या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. प्रणवचे वडील राम खेंडेकर हे पोलीस दलात कार्यरत असून ते पोलीस लाईन परिसरातच वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्रणव घराबाहेर खेळत होता. त्यावेळी परिसरात भटकणाऱ्या तीन मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला बोलला. कुत्र्यांनी प्रणवला जमिनीवर पाडून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये त्याच्या शरीरावर, हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
कुत्र्यांच्या तावडीत सापडलेल्या चिमुकल्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचा आवाज ऐकून घरातील पालकांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे त्या बालकाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका झाली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रणवला तात्काळ रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर शहरातील नागरिक आणि विशेषतः पोलीस लाईन परिसरातील पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून, लहान मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

​”मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर नगरपालिका प्रशासन नेमकी कधी ठोस कारवाई करणार? प्रत्येक वेळी एखादी गंभीर घटना घडल्यानंतर केवळ बैठकांचे सत्र आणि पोकळ घोषणाच केल्या जाणार का?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. कागदोपत्री आश्वासने देण्याऐवजी नगरपालिकेने प्रत्यक्ष मैदानात उतरून या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता रत्नागिरीकरांमधून केली जात आहे.