Wednesday, September 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच; मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के एसीबीच्या जाळ्यात

चिपळूण:- सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिपळूण तालुक्यातील मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे चिपळूणच्या महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याचे काम होते. हे काम करून देण्यासाठी मंडल अधिकारी उमेश राजेशिर्के यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने सापळा रचला.

चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना उमेश राजेशिर्के यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महसूल विभागातील मंडल अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेत खळबळ उडाली असून, सातबारा व फेरफाराच्या कामांसाठी नागरिकांकडून होणाऱ्या कथित लाचेच्या मागण्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.