Monday, August 31, 2026
spot_img
Home गुन्हेगारी जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर कारवाईचा दणका

जिल्ह्यात पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर कारवाईचा दणका

खेड, गुहागर, चिपळूण अन् रत्नागिरीत धाडी, लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत दि. २८ ऑगस्ट रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार अड्ड्यांवर एकाच दिवशी जोरदार धाडी टाकण्यात आल्या. खेड, गुहागर, चिपळूण आणि रत्नागिरी शहर परिसरात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल्स, रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य असा एकूण लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोटे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत मौजे खेड ते शिवतर जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास कल्याण मटका जुगाराच्या शुभ अंकावर पैसे लावून खेळ खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खेड पोलिसांचे हवालदार अजित संतोष कदम यांनी सहकाऱ्यांसह या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत भरणे नाका येथील रहिवासी आरोपी प्रवीण गोविंद कोलगे (वय ५२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीची सुझुकी ज्युपिटर दुचाकी (क्र. MH 08 AH 2513), २,००० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे पावती पुस्तक असा एकूण ८२,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शृंगारतळी बाजारपेठेतील वक्रतुंड हॉटेलच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये संध्याकाळी ७.२२ च्या सुमारास ‘पुणे बाजार’ मटका खेळवला जात असताना पोलिसांनी धाड टाकली. गुहागर पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रितेश रहाटे यांच्या फिर्यादीवरून निलेश दिनकर जाधव (वय २८, रा. शृंगारतळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून रोख रक्कम व साहित्य मिळून १,७७५ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.

तसेच चिपळूण येथील खेर्डी बाजारपेठेत संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या बाजूला असलेल्या कोकण हाईट्स इमारतीचा ताबा घेऊन जुगार खेळवणाऱ्या देवकुमार शाम जुवळे (वय ४३, रा. गोवळकोट भोईवाडी) याला चिपळूण पोलिसांनी रात्री ८ वाजता रंगेहाथ पकडले. चिपळूण पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप माणके यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून १२,५०० रुपयांचा रेडमी अँड्रॉइड मोबाईल आणि १६५० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १४,१५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांतीनगर कमानीजवळील रावजी चहाच्या दुकानामागे पत्र्याच्या शेडमध्ये संध्याकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास कल्याण मटक्याचा खेळ चालवला जात होता. महिला पोलीस हवालदार अमिता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन रघुनाथ गुरव (वय ३७, रा. रसाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात कारवाई केली. या ठिकाणाहून ९५० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
​एकाच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागात पोलिसांनी आखलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध मटका व जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध धंद्यांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र स्वरूपात सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.