संगमेश्वर:- तालुक्यातील मेघी फौजदारवाडी येथे दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावानेच भावावर लहान सुरीने वार करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दीपक करंबेळे दिपक बाबी करंबेळे (वय ४८ वर्षे) आणि आरोपी दशरथ करंबेळे (वय ४७ वर्षे, रा. मेघी फौजदारवाडी, ता. संगमेश्वर) हे सख्खे भाऊ असून एकाच घरात आई-वडिलांसोबत राहतात. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत राहत नाहीत. २५ ऑगस्ट रोजी रात्री दीपक हे दारू पिऊन घरी आले, तेव्हा आरोपी दशरथ याने त्यांना, “तू दररोज दारू पिऊन घरी येतोस, घरातील काही काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाही,” असे म्हटले.
यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची व वाद झाला. वादादरम्यान आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने थापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातील कांदा कापण्याच्या लहान सुरीने फिर्यादीच्या पोटावर व डाव्या हाताच्या मनगटावर वार करून दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी दिनांक २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(१), ११५(२), ३५१(२), ३५२ (तसेच जुन्या कायद्यानुसार ३२४, ३२३, ५०४, ५०६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.









