Friday, August 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक

केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात केवायसीच्या बहाण्याने २ लाख ७६ हजारांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुनील माळी (वय ४७ वर्षे, रा. पालेकोंड, ता. मंडणगड) यांच्या मोबाईल नंबरवर पाट, ता. मंडणगड येथील अशोक नटे यांच्या मोबाईल नंबरवरून एक मेसेज आला होता. बँक ऑफ इंडियाच्या नावाने पाठवलेली ती केवायसी एपीके लिंक फिर्यादीने ओपन केली. लिंक ओपन केल्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या बँक खात्यातून परस्पर २ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली, ज्यामुळे त्यांची ऑनलाइन फसवणूक झाली. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

या प्रकरणी फिर्यादीच्या अर्जावरून दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३:५० वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम ६६ (क), (ड) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.