Friday, August 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 596 मतदारांची नावे वगळणार

जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 596 मतदारांची नावे वगळणार

रत्‍नागिरी:- मतदार यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात (एसआयआर) रत्‍नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये मतदारांचे डिजिटायजेशनचे शंभर टक्‍के काम पूर्ण झाले असून 13 लाख 29 हजार 42 मतदारांपैकी 11 लाख 97 हजार 446 मतदारांचे डिजिटायजेशन पूर्ण झाले आहे. तब्‍बल 1 लाख 31 हजार 596 मतदारांचे अर्ज जमा न झाल्‍याने ही नावे वगळली जाणार आहेत. यामध्‍ये जिल्‍ह्यात रत्‍नागिरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 43 हजार 569 मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. दरम्‍यान एसआयआरचे आता सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून अंतिम यादी 4 नोव्‍हेंबर रोजी प्रसिध्‍द होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने आता मतदार याद्यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत गृहभेटीद्वारे गणना अर्ज भरुन घेण्‍याचा कार्यक्रम 17 ऑगस्‍ट रोजी संपला आहे. त्‍यानंतर मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण आणि प्रारुप मतदार याद्या तयार करण्‍यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूणर्ह करण्‍याच्‍या उद्देशाने वेळापत्रकार निवडणूक विभागाने सुधारणा केली आहे.
एसआयआरचा कार्यक्रम जाहीर होण्‍यापूर्वी जिल्‍ह्यात 13 लाख 29 हजार 42 मतदारांची नोंद होती. गृहभेटीत या सर्वांना अर्जांचे वाटप करण्‍यात आले होते. एसआयआरच्‍या17 ऑगस्‍ट पर्यत संपलेल्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील कार्यक्रमात जिल्‍ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 11 लाख 97हजार 446 मतदारांचे डिजिटायजेशन करण्‍यात आले. जिल्‍ह्यात डिजिटायजेशनचे काम शंभर टक्‍के पूर्ण झाले आहे. तब्‍बल 1 लाख 31 हजार 596 अर्ज पुन्‍हा बीएलओंकडे जमा झाले नाहीत. त्‍यामुळे ही नावे वगळण्‍यात आली आहेत.

जिल्‍ह्यात रत्‍नागिरी विधानसभा मतदार संघात तब्‍बल 43 हजार 569 मतदारांचे अर्ज व माहिती न मिळाल्‍याने ही नावे वगळली जाणार आहे. दापोली विधानसभा मतदार संघात 25 हजार 643, गुहागर विधानसभा मतदार संघात 19 हजार 889, चिपळूण विधानसभा मतदार संघात 25 हजार 386 तर राजापूर विधानसभा मतदार संघात 17 हजार 109 मतदारांचे अर्ज जमा न झाल्‍यामुळे वगळली जाणार आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण व पुनर्रचना 24 ऑगस्‍ट रोजी करण्‍यात येणार असून 31 ऑगस्‍ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर 31 ऑगस्‍ट ते 30 सप्‍टेंबर या कालावधीत दावे व हरकतींसाठी कालावधी देण्‍यात आला आहे. ज्‍या मतदारांची नावे वगळली गेली असतील म्‍हणजेच प्रारुप यादीत नावे नसतील त्‍यांनी आणि 1 ऑक्‍टोबर 2026पर्यत 18 वर्ष पूर्ण करणार्‍या नवमतदारांनी यादीत नाव येण्‍यासाठी ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज क्रमांक 6 सादर करता येणार आहे. दरम्‍यान 31 ऑगस्‍ट ते 29 ऑक्‍टोबर या कालावधीत नोटिसांबाबतची कार्यवाही आणि हरकती निकालात काढण्‍याची कार्यवाही करण्‍यात येणार आहे. 4 नोव्‍हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द होणार आहे.