Thursday, August 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरकरवाड्यात १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एकाला अटक

मिरकरवाड्यात १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एकाला अटक

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, १२ वर्षीय बालकाशी गैरप्रकार केल्याप्रकरणी एका ५२ वर्षीय प्रौढावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलाल सोलकर (वय ५२, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, संशयित जलाल सोलकर याने परिसरातील एका अल्पवयीन मुलाशी ओळख वाढवली. ओळखीचा गैरफायदा घेत आणि विश्वासात घेऊन त्याने या बालकासोबत गैरप्रकार केला. हा प्रकार अत्यंत गुपचूप सुरू होता, मात्र काही दिवसांनंतर हा संतापजनक प्रकार पिडीत बालकाच्या पालकांच्या निदर्शनास आला. आपल्या मुलासोबत घडलेली ही लाजिरवाणी घटना समजताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी न घाबरता धाडस दाखवत तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देत तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाईची सूत्रे हलवली. पोलिसांनी संशयित जलाल सोलकर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही वेळातच संशयित जलाल सोलकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.