गुहागर:- तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूण येथील दोन तरुणांचा समुद्राच्या खोल पाण्यात बुडून करुण अंत झाला. अचानक आलेल्या मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे ही दुर्घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिपळूण येथील गोवळकोट परिसरातील रहिवासी असलेले सलीम पटेल आणि जावेद सुर्वे हे दोघे तरुण मंगळवारी गुहागर तालुक्यातील बुधल समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. किनाऱ्यावरील मोठ्या खडकांवर उभे राहून दोघेही फिशिंग रॉडच्या सहाय्याने मासेमारी करत होते.
मासेमारी सुरू असतानाच समुद्रात अचानक एक मोठी लाट आली. खडकावर उभे असलेल्या या दोन्ही तरुणांना या लाटेच्या प्रचंड वेगाचा अंदाज आला नाही. क्षणात आलेल्या या लाटेने दोघांनाही खडकावरून थेट समुद्राच्या उधाणलेल्या पाण्यात ओढून नेले. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने दोघांनाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि पाण्यात वाहून गेले.
घटना घडल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्याची पाहणी केली. स्थानिक मच्छीमार व नागरिकांच्या मदतीने दोन्ही तरुणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.
सलीम पटेल आणि जावेद सुर्वे यांच्या या अचानक जाण्याने चिपळूणच्या गोवळकोट परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे. दोन्ही तरुण मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.









