Friday, August 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक जाहीर

जिल्हा पोलीस दलातील १२ अधिकारी व अंमलदारांना सेवा पदक जाहीर

रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलातील दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवेची दखल घेऊन, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १२ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना प्रतिष्ठित पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये ८ जणांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ तर ४ जणांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

अति उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये नीलकंठ बगळे (पोलीस निरीक्षक, लांजा पोलीस ठाणे), नितीन दत्तात्रय ढेरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), काशीनाथ महादेव गुरव (श्रेणी पो.उ.नि, पोलीस मुख्यालय), संजय शिवाजी साळवी (श्रेणी पो.उ.नि, लांजा पोलीस ठाणे), निशा दीपक केळकर (म.पो.हवा. जिल्हा विशेष शाखा), वैदेही विनोद कदम (म.पो.हवा. पोलीस मुख्यालय), महेश दगडू गुरव (पो.हवा. जिल्हा विशेष शाखा), आशिष वसंत शेलार (पो. हवा. लांजा पोलीस ठाणे) तर उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार यांच्यामध्ये अमित आनंदराव यादव (पोलीस निरीक्षक, राजापूर पोलीस ठाणे), फुलचंद भगवानराव मेंगडे (पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाणे), विजय तानाजी आंबेकर (पो.हवा. स्था.गु.अ.शा.), अमोल अरुण गमरे (पो.हवा., जिल्हा विशेष शाखा) यांचा समावेश आहे.

या सर्व अधिकारी व अंमलदारांनी आपल्या कर्तव्यकाळात बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशाबद्दल पोलीस दलातून कौतुक होत आहे.