खेड:- खेड एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत महिला व पुरुष प्रवाशांसमोर गोंधळ घालून आरडाओरडा करणाऱ्या एका व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेड एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक परिसर येथे हा प्रकार घडला. आरोपी श्याम धोंडु कदम (रा. गव्हे गुरववाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हा मद्यधुंद (दारू पिलेल्या) अवस्थेत एसटी स्टँडवर आला. तिथे उपस्थित महिला आणि पुरुष प्रवाशांसमोर कोणतीही सबब नसताना त्याने गोंधळ घातला आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी खेड एसटी स्टँडचे वाहतूक नियंत्रक राजेंद्र लक्ष्मण कदम यांनी फिर्याद दिली असून, आरोपी श्याम धोंडु कदम याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:४८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









