रत्नागिरी:- शहरातील शनिवार आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जुन्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांनी न्यायालयात दाखल केलेला दावा अद्याप प्रलंबित असल्याने, या नवीन इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी आता न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार बाजारातील जुनी इमारत अत्यंत धोकादायक झाली होती. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी गाळेधारकांना गाळे रिकामे करून इमारत नगर परिषदेच्या ताब्यात देण्याबाबत कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात जुन्या गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली, ज्यामुळे नवीन शॉपिंग सेंटरच्या उभारणीचे काम रखडले आहे.
सदर प्रस्तावित शॉपिंग सेंटरचे बांधकाम हे शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळालेल्या निधीतून केले जाणार आहे. भविष्यात न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी नगर परिषदेने आधीच पूर्वतयारी केली आहे. त्यानुसार ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन ठेवण्यात आली आहे.
न्यायालयाचा निकाल लागताच या भव्य आणि आधुनिक शॉपिंग सेंटरच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होईल आणि कामाला तात्काळ गती मिळेल, अशी अपेक्षा नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.









