चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मौजे गजमल पिंपळी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून तब्बल ३ लाख ३७ हजार २३२ रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास रघुनाथ गजमल (वय ६१, रा. परळ भोईवाडा, मुंबई, मूळ रा. गजमल पिंपळी बुद्रुक, ता. चिपळुण) यांच्या राहत्या घरात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी-कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४२.१६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७४.८०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा एकूण ३,३७,२३२ रुपयांचा ऐवज चोरी करून नेला.
या प्रकरणी विलास गजमल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:४४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.









