Thursday, August 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी पांगरी येथील दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूची तीन महिन्यांनंतर पोलीस नोंद

पांगरी येथील दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूची तीन महिन्यांनंतर पोलीस नोंद

लग्नावरून परतताना हातखंबा येथील दोघांचा झाला होता मृत्यू

रत्नागिरी:- देवरूख–पांगरी मार्गावर २६ एप्रिल रोजी घडलेल्या भीषण अपघाताची अखेर तीन महिन्यांनंतर देवरूख पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली आहे. तपास प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक २७/२०२६ व २८/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. फेटल मोटार अपघात रजिस्टरमधील कागदपत्रांची पडताळणी आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

२६ एप्रिल रोजी लग्न आटोपून देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना पांगरी फाट्याजवळ दुचाकीवर असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला होता. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ज्युपिटर दुचाकी रस्त्यालगतच्या दगडी मोरीवर आदळली. या भीषण अपघातात सुमित विलास कांबळे आणि विकास काशिराम कांबळे (दोघेही रा. हातखंबा, जि. रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला होता.

या घटनेने त्या वेळी जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली होती. आता तीन महिन्यांनंतर या प्रकरणाची अधिकृत पोलीस नोंद झाल्याने अपघाताच्या तपास प्रक्रियेला औपचारिक पूर्णविराम मिळाला आहे.