मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून पोहोचला १६ हजार ९०९ कोटींवर
रत्नागिरी:- मुंबईला गोव्याशी जोडणाऱ्या आणि कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला १७ वर्षे उलटूनही पूर्णत्व आलेले नाही. कामाचा वेग मंदावलेला असतानाच महामार्गाच्या चौपदरीकरणाचा खर्च ११ हजार ४०९ कोटी रुपयांवरून तब्बल १६ हजार ९०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एवढी मोठी खर्चवाढ होऊनही महामार्गाचे काम अपूर्णच असल्याने कोकणवासीयांचा कोंडीयुक्त आणि त्रासदायक प्रवास सुरूच आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले. या प्रकल्पातील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या दहा पॅकेजच्या जवळपास ३५५ किमी लांबीच्या कामाला मार्च २०१६ पासून सुरुवात झाली. काही कामांची कंत्राटे पुढील वर्षी देण्यात आली. मात्र, कामे अपेक्षित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा खर्च सातत्याने वाढत गेला.
या संदर्भातील माहिती द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातून मिळवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एवढा विलंब का झाला, वाढीव खर्चाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी-लांजा भागात काम रखडले : चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट ते आरवली या मार्गाचे कामही रखडले आहे. या मार्गाच्या कामाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, संपूर्ण प्रकल्पातील ही सर्वाधिक खर्चवाढ असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. रत्नागिरी आणि लांजा तालुक्यांतील कामे अद्याप मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. आरवली ते लांजा मार्गाचे काम अपूर्ण असून चिपळूणमधील उड्डाणपूल पूर्ण होऊनही त्याला जोडरस्ता तयार झालेला नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने वापरता येत नसल्याची स्थिती आहे.
खर्चाचा लेखाजोखा: इंदापूर ते झाराप लांबी ३५५ किमी पॅकेज १० टप्प्यांत काम कामाची सुरुवात मार्च २०१६ प्रारंभीचा खर्च ११,४०९ कोटी- वाढलेला खर्च १६,९०९ कोटी, खर्चवाढ ५,५०० कोटी, खर्चवाढीचे प्रमाण ४८ टक्के -आतापर्यंतचा खर्च ११,५७७ कोटी
परशुराम घाट-आरवली एका पॅकेजचा खर्च दुपटीहून अधिक मार्गाची लांबी ३४.४५ किमी कंत्राट जुलै २०१६ प्रारंभीचा खर्च ९८३ कोटी वाढलेला खर्च २,२२६ कोटी खर्चवाढ -१,२४३ कोटी खर्चवाढीचे प्रमाण- १२६ टक्के









