Monday, August 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून मुरुगवाडा येथील प्रौढाचा मृत्यू

मिरकरवाडा जेटी येथे समुद्रात बुडून मुरुगवाडा येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरातील समुद्राच्या पाण्यात बुडून एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सहास रघुनाथ मांडवकर (रा. मुरुगवाडा सचिन पिलणकर यांच्याकडे भाड्याने, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सहास मांडवकर याला बऱ्याच वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन होते. १ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी मिरकरवाडा जेटी येथील समुद्राच्या पाण्यात एक इसम मिळून आला होता. त्याचा चेहरा सुहास मांडवकर याच्यासारखा दिसत असल्याची माहिती खबर देणार दीपक रघुनाथ मांडवकर यांचा मित्र राज बिर्जे याने फोन करून दिली.

त्यानंतर दीपक मांडवकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, तो मृत तरुण त्यांचा सख्खा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे आणण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.