Sunday, August 2, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी रेल्वे स्टेशन पार्किंगमधून २१ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

रत्नागिरी रेल्वे स्टेशन पार्किंगमधून २१ हजारांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या दुचाकी पार्किंग परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत २१ हजार रुपये किमतीचे ब्राऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता करण्यात आली.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५६/२०२६ अन्वये एन.डी.पीएस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २१ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस हवालदार विवेक श्रीधर रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अब्दुल रऊफ इक्बाल डोंगरकर (रा. कर्ला, ता. जि. रत्नागिरी) याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर हद्दीत गस्तीवर होते. पथकाने माळनाका – नाचणेरोड – कुवारबाव असा मार्ग पूर्ण केल्यानंतर कुवारबाव ते रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी सुरू केली. यावेळी रेल्वे स्टेशनच्या दुचाकी पार्किंगमध्ये आरोपी हा बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित स्थितीत फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले व त्याच्याकडून २१,००० रुपये किंमतीचा ब्राऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.