Friday, July 31, 2026
spot_img
Home राजकीय आफरोज झारी यांचे राजापूर न. प. तील नगरसेविकापदाचे सदस्यत्व रद्द

आफरोज झारी यांचे राजापूर न. प. तील नगरसेविकापदाचे सदस्यत्व रद्द

जिल्हा जातपडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र अवैध

राजापूर:- राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास वर्ग न्हावी जातीचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांचे नगरसेविका पदाचे सदस्यत्व रह झाल्याचे जाहीर केले आहे. तसे आदेश जिंदल यांनी दिले असून याबाबतचा हा आदेश झारी यांनाही बजावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आता झारी यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.

आफरोज महमद झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेबाबत जात पडताळणी समिती, रत्नागिरी यांचे आदेशाचे दिनांकापासून आफरोज महमद झारी यांचे राजापूर न.प. कडील नगरसेविका पदाचे सदस्यत्व रह झाल्याचे जाहीर करीत आहे व राजापूर न.प. कडील प्रभाग क्र.६ ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही जागा रिक्त झालेचे घोषित करीत आहे असे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात नमुद केले आहे.

या प्रकरणी राजापूर नगर परिषदेकडून जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला होता. राजापूर न.प. सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित प्रवर्गातून प्रभाग क्र.६ ‘अ’ मधून निवडून आलेल्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. या आदेशाबाबत जात पडताळणी समितीने उपविभागिय अधिकारी व राजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना कळविले होते. यानंतर राजापूर मुख्याधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी व उपविभगिय अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर तात्काळ जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी आपले आदेश जारी केले आहेत.

आफरोज महमद झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेबाबत जात पडताळणी समिती, रत्नागिरी यांचे आदेशाचे दिनांकापासून आफरोज महमद झारी यांचे राजापूर न.प. कडील नगरसेविका पदाचे सदस्यत्व रह झाल्याचे जाहीर करीत आहे व राजापूर न.प. कडील प्रभाग क्र. ६ ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ही जागा रिक्त झालेचे घोषित करीत आहे असे जिल्हाधिकारी यांनी या आदेशात नमुद केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या या आदेशामुळे झारी यांचे नगरसेवकपद रद्द झाले असून यापुढे त्यांना नगर परिषदेच्या कोणत्याही सभा वा निर्णयांमध्ये सहभाग घेता येणार येणार नाही.

या निर्णयामुळे नगर परिषद सभागृहात महाविकास आघाडीचे संख्याबळ एक ने कमी झाले आहे. आता महाविकास आघाडीकडे लोकनियुक्त नगराध्यक्षपद असून सभागृहात काँग्रेस सहा व शिवसेना उबाठा तीन असे नऊ सदस्यांचे बहुमत आहे. तर महायुतीकडे शिवसेना नऊ व भाजपा एक असे दहा सदस्यांचे बहुमत आहे. मात्र नगराध्यक्षांना असलेल्या मतदानाच्या विशेषाधिकारामुळे महाविकास आघाडीचे बहुमत कायम रहाणार आहे.

प्रभाग सहा अ ची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता

जातपडताळणी समितीने दिलेल्या आदेशावर झारी यांचे नगरसेवक पद रद्द करून जिल्हाधिकारी यांनी शिक्कामोर्तब केल्याने या प्रभागातील या एका रिक्त जागेसाठी राजापुरात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या निवडणूकीची चर्चाही शहरात सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणी झारी या जातपडताळणीं समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार काय याबाबतही उत्सुकता आहे.