२.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि नाटे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाटे येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील १.९१ लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ मार्च २०२६ दरम्यान नाटे येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २.९१ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(३)(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तपासासाठी नियुक्त करण्यात आले. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ जुलै रोजी एलसीबीच्या पथकाने विक्रम भूप पवार (वय २३)आणि संतोष बिलप्पा पवार (वय २०)या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीतील १.९१ लाखांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी नाटे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदारविजय आंबेकर,पोलीस हवालदार दिपराज पाटील, पोलीस हवालदार योगेश नांदकर, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे, यांचा सहभाग होता. दरम्यान ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्पर तपासामुळे यशस्वी ठरली असून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे.









