खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने मॅगीने भरलेला कंटेनर घेऊन निघालेला ट्रक पुलावर आल्यानंतर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील दोन पुलांच्या मधून थेट जगबुडी नदीच्या पात्रात कोसळला. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे कंटेनर सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत वाहत जाऊन एका ठिकाणी अडकला. या अपघातात कंटेनरमधील हजारो मॅगीची पाकिटे नदीच्या पाण्यात विखुरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अंधार आणि पूरस्थितीमुळे बुधवारी रात्री बचावकार्य मर्यादित ठेवण्यात आले.
गुरुवारी सकाळी खेडचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बचावमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांनी अत्यंत धाडस आणि नियोजनबद्ध पद्धतीने दोन बोटींचा वापर करत बचावकार्य हाती घेतले. एका बोटीत जवान तर दुसऱ्या बोटीत जनरेटर आणि आवश्यक उपकरणे नेण्यात आली. पाण्याचा वेग, सततचा पाऊस आणि नदीतील प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत जवानांनी कंटेनरपर्यंत पोहोचून केबिनपर्यंत प्रवेश केला. अखेर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.
या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा जगबुडी नदी पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून अपघातप्रवण म्हणून ओळखला जात असून येथे यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. अनेक निष्पाप प्रवाशांना या पुलावर आपला जीव गमवावा लागला असून, तरीही या पुलाला अद्याप अधिकृतपणे ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनीही पुलावरील सुरक्षेच्या उपाययोजना वाढविण्याची मागणी केली आहे. विशेषतः पुलावरील संरक्षण भिंती अधिक मजबूत करणे, धोकादायक वळणांवर इशारा फलक लावणे, वेगमर्यादेची कठोर अंमलबजावणी करणे आणि ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.









