Friday, July 24, 2026
spot_img
Home गुन्हेगारी घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; एकाला अटक

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; एकाला अटक

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर तालुक्यातील एका गावात २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली. संशयित नरेश काशीराम गुरव याने घरात कोणी नसताना एका अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.

पीडित मुलीने धाडस दाखवत आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी पीडितेचे वडीलही तिथे पोहोचल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला तात्काळ अटक केली असून, या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.

संशयितावर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(१), ७६ आणि पॉक्सो कायदा कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे राजापूर तालुक्यात तीव्र संताप उसळला आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमाला कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून जोर धरत आहे.