रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचे एक मोठे जाळे पोलिसांनी उधळून लावले आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँकांच्या खात्यांचा वापर करून देशभरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. १९ जुलै २०२६ रोजी रत्नागिरीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवशी तब्बल १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करून मिळवलेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता, ‘म्युल अकाउंट’ वापरतात. हे गुन्हेगार काही ठराविक बँक खातेधारकांना प्रलोभने देऊन त्यांची खाती भाड्याने घेतात किंवा ती वापरण्यास परवानगी घेतात. त्यानंतर फसवणुकीची रक्कम या खात्यांत जमा केली जाते आणि तिथून ती त्वरित दुसऱ्या खात्यांत हस्तांतरित केली जाते. या प्रकरणात रत्नागिरीतील विविध बँकांच्या खात्यांचा वापर करून देशभरातील नागरिकांकडून लाखो रुपये उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खालीलप्रमाणे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत ज्यात राजापूरात राजापूर अर्बन बँक खात्यात ६५,००० रुपयांची फसवणूक, चिपळूणात बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन बॅंक खात्यात एकूण १२ सायबर प्रकरणांशी संबंधीत २ गुन्हे दाखल,मंडणगडात बँक ऑफ इंडिया खात्यात ३ प्रकरणांशी संबंध १ गुन्हा, लांजात बँक ऑफ इंडिया खात्यात फसवणुकीची रक्कम त्वरित यूपीआयद्वारे हस्तांतरित, दापोलीत युनियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यात २ गुन्हे, गुहागरात बँक ऑफ इंडिया, अंजनवेल खात्यात २०,९७९ रुपयांची फसवणूक, खेड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखेत एकूण ८१,४२० रुपयांची फसवणूक असे जिल्ह्यात एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत.
सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही ठिकाणी फसवणुकीच्या गंभीर कलमांचाही समावेश आहे. यातील आरोपींनी संगनमत करून बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे.
“कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, डेबिट कार्ड किंवा युपीआय तपशील देऊ नका. जर तुमच्या बँक खात्याचा वापर बेकायदेशीर व्यवहारांसाठी झाला, तर तुम्हालाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते,” असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलीस सध्या या सर्व बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार तपासत असून, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.









