माजी नगराध्यक्षांची फसवणूक प्रकरणी राजापूर पोलिसांचे तपासात यश
राजापूर:- राजापूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक ॲड. जमीर खलिफे यांच्या मोबाईलच्या व्हॉटसॲपवर फेक लिंक पाठवून झालेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी राजापूर पोलिसांना तपास लावण्यात यश आले आहे. या सायबर गुन्ह्यात राजापूर पोलिसांनी ॲड. खलिफे यांची गेलेली तीन लाख रूपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी पुणे व परिसरातील पाच संशयित आरोपींविरोधात कारवाई करत त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वा.चे दरम्यान यातील फिर्यादी ॲड. खलिफे यांचे वडील निजामउद्दीन खलिफे हे घरी असताना त्यांच्या व्हॉट्सॲप मोबाईलवर अज्ञाताकडून RTO E- Challan.apk फाईल मेसेज त्यांना पाठविण्यात आला होता. या मेसेजमध्ये व्हेईकल रजिस्ट्रर नंबर व चलन नंबर नमूद करण्यात आले होते. ॲड. खलिफे यांच्या वडिलांनी RTO E- Challan. apk फाईल मेसेज त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविला. फिर्यादी यांनी ती फाईल ओपन केली. त्यानंतर ॲड. खलिफे यांना आधार ओटीपीचा मेसेज आला. त्यानंतर थोड्या वेळाने ॲड. खलिफे यांच्या Indusind Bank शाखा राजापूरच्या सेव्हींग खात्यातून एकूण ३,००,०००/- रुपये अज्ञाताने ऑनलाईनद्वारे डेबीट केल्याचा मेसेज ॲड. खलिफे यांना आला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, RTO E-Challan.apk फाईल ओपन केल्याने ऑनलाईन फ्रॉड होऊन आपली आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी तत्काळ ॲड. जमीर खलिफे यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दिली. तर ऑनलाईन फसवणूक झाल्याने ॲड. खलिफे यांनी १९३० या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदविली.
या प्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असता पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत काहींनी कर्ज घेतले होते व त्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांना पुणे येथे तपासासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी १) मितेश जालींदर वाघुले, वय ३४ वर्षे, रा. पांडुरंगवाडी महाळुंगे तर्फे निमगाव जुन्नर जि. पुणे, २) किरण मच्छिंद्र नेहरकर, वय २४ वर्षे, रा. येडगाव जुन्नर जि.पुणे, ३) विजय काशिनाथ वोऱ्हाडे, वय ४५ वर्षे, रा.मु.केळी पो. चावंड ता. जुन्नर जि. पुणे, ४) दत्तात्रय गंगाराम गवारी, वय ४४ वर्षे, रा. मु.सुकाळवेढे पो. आंबे ता. जुन्नर जि.पुणे, ५) गंधार संजय रत्नपारखी, वय ३३ वर्षे, रा. वाजारपेठ लक्ष्मीनारायण मंदिराच्या जवळ नारायणगांव, जि. पुणे असे पाच संशयित या प्रकरणात असल्याचे आढळून आले. यातील मुख्य संशयित आपोली शादाब अन्सारी, वय ४१ वर्षे रा. सन ऑफ रियासत अली नियर क्लासिक बेकरी हुंडाई चौक खालुवे, चाकण तळेगाव रोड खालुवे, जि. पुणे हा असून तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणात आणखी सखोल तपास पोलीस करत असून त्यांच्याकडून अन्य ठिकाणी अशा प्रकारे फ्रॉड झाला आहे काय याचीही तपासणी केली जात आहे.
अशा प्रकारे लोन भरण्यासाठी कमिशन पद्धतीने व्यवहार केले जातात व अशा प्रकारच्या फेक लिंक पाठवून अन्य व्यक्तींची फसवणूक केली जाते, हे या तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी या पाचही संशयित आरोपींची सखोल चौकशी करण्यात आली. यातील ॲड. खलिफे यांच्या मोबाईलवर ती लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करून काढलेले तीन लाख रूपये हे मितेश जालींदर वाघुले व किरण मच्छिंद्र नेहरकर यांच्या पुणे येथील फिनकॉर्प कंपनी मार्फत घेतलेल्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले होते. पोलिसांनी ही रक्कम तत्काळ ॲड. खलिफे यांच्या खात्यात वर्ग केली आहे.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार, दीपक काळे यांनी तपासकामी परिश्रम घेत या गुन्ह्याचा तपास लावला आहे. राजापूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.









