सर्व प्रकारची जड वाहने, खासगी वाहनाना बंदी
रत्नागिरी:- पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दि. ९ जुलैपासून ते दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ रघुवीर घाटच्या साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. कि.मी. १००/५०० ते १०५/५०० मध्ये डांबरी पृष्ठभाग आणि साईडपट्टी खचली आहे. रस्त्यावर माती व दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने,
एस.टी. महामंडळाच्या बसेसना परवानगी आहे. तर
सर्व प्रकारची जड वाहने, इतर सर्व प्रकारची खासगी वाहनाना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना घाटातील पर्यटन स्थळांवर थांबण्यास आणि वाहतुकीस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी आणि मानवी जीविताच्या सुरक्षेसाठी हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. असेही यात म्हटले आहे.









