रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3 आणि 4 जुलै रोजी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्याने थांबलेला मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्राला ३० जून ते ४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 105.59 च्या सरासरीने 950 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात मंडणगड तालुक्यात 120.25 मिली मीटर, दापोली 105.00 मिमी, खेड 65.14 मिमी, चिपळूण 87.77 मिमी, गुहागर 127.60 मिमी, संगमेश्वर 110.00 मिमी, रत्नागिरी 143.77 मिमी, लांजा 84.60 मिमी आणि राजापूर तालुक्यात 106.25 मिमी पाऊस पडला आहे.
दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागातील पाणी टंचाई पूर्णतः दूर झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. मौजे गोळप, मानेवाडी येथील सागर शशिकांत मोहिते यांचे घराजवळील संरक्षक भिंत पडून सुमारे 30 हजार रु एवढे नुकसान झाले आहे. महामार्ग निवळी येथे रस्त्यावर दरड कोसळून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर या घटनेत एक दुचाकीस्वार देखील जखमी झाल्याची घटना घडली. देवरुख येथे अंतर्गत मार्गावर रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.









