Tuesday, June 30, 2026
spot_img
Home लांजा रानटी डुकराच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात प्रौढाचा मृत्यू

रानटी डुकराच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात प्रौढाचा मृत्यू

लांजा येथील प्रौढाचा रत्‍नागिरीत उपचारादरम्यान अंत

लांजा:- रस्त्याने दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक समोर आलेल्या रानटी डुकराच्या धडकेमुळे गंभीर जखमी झालेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा प्रदीर्घ उपचारांनंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दिनकर सखाराम मांडवकर (वय ५३, रा. आसगे, मांडवकरवाडी, ता. लांजा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर मांडवकर हे लांजा येथून कलिंगड विक्री करून आपली दुचाकी (एमएच ०८ ए एव्ही ७५४९) घेऊन घरी परतत होते. धुंदरे गावाजवळील बेणी नदीच्या पुलापुढील वळणावर असताना अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपातून एक रानटी डुक्कर त्यांच्या दुचाकीसमोर आले. या धडकेत मांडवकर हे रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती.

अपघातानंतर त्यांना तातडीने लांजा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरीतील चिरायू रुग्णालयात दाखल केले. काही काळासाठी त्यांना लांजा येथील स्वामी समर्थ रुग्णालयातही हलवण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने आणि ते बोलण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांना घरी आसगे येथे नेण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते.
​दरम्यान, त्यांना लघवीच्या जागी संसर्ग झाल्याने प्रकृती अधिकच खालावली. त्यांना पुन्हा तातडीने चिरायू रुग्णालयात आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.