दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मिथील शहा यांचा मृतदेह सापडला
चिपळूण:- ठाणे येथून सासरी चिपळूणला आलेल्या ३३ वर्षीय तरुणाने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिथील अशोक शहा (वय ३३, रा. दिवा, ठाणे) असे या मयत तरुणाचे नाव असून, २५ जून रोजी सकाळी त्यांचा मृतदेह चिपळूण येथील पेठमाप पुलाजवळ वाशिष्ठी नदीच्या पात्रात आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथील शहा यांचे सासरे चिपळूण येथे राहतात. नुकत्याच झालेल्या वादळात त्यांच्या घराचे छप्पर उडून ते जखमी झाले होते. सासरच्यांना पाहण्यासाठी मिथील शहा २३ जून रोजी ठाणे ते चिपळूण असा प्रवास करून चिपळूणला पोहोचले होते.
२३ जून रोजी रात्री १० च्या सुमारास त्यांनी आपली पत्नी माही शहा हिला फोन करून, “तुला आता जे काही बोलायचे आहे ते बोल, मी पुलावरून खाली पाण्यात उडी घेऊन जीव देतो,” असे म्हणून संवादाचा शेवट केला होता. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. पती बेपत्ता झाल्याने माही शहा यांनी २४ जून रोजी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
सलग शोध सुरू असताना, २५ जून रोजी सकाळी ८:४५ च्या सुमारास पेठमाप पुलाजवळ वाशिष्ठी नदीच्या पात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. हा मृतदेह मिथील शहा यांचाच असल्याची ओळख पटली. त्यांनी गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









