Friday, September 25, 2026
spot_img
Home चिपळूण राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी इंटेलिजन्स ब्युरो सतर्क

राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणासाठी इंटेलिजन्स ब्युरो सतर्क

कोयना प्रकल्पाच्या सुरक्षा आराखड्याचा ३ दिवसांचा आढावा

चिपळूण:- भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेचे पथक पोफळीला दाखल झाले आहे. त्यांच्याकडून कोयना प्रकल्पाच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. कोयना प्रकल्प राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे सुरक्षेच्या आढाव्याबाबतचे काम गुप्तपणे सुरू आहे. इंटेलिजन्स ब्युरो ही गुप्तचर संस्था देशाच्या सुरक्षेसाठी माहिती गोळा करण्याचे आणि अंतर्गत धोके रोखण्याचे काम करते. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणारी ही संस्था देशांतर्गत गुप्त माहिती मिळवणे, दहशतवादविरोधी कारवाया आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे काम करते.

कोयना प्रकल्प ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात राष्ट्राला मिळालेला हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेषा असल्याचे बोलले जाते. या प्रकल्पातून राज्याला २ हजार मेगावॉट वीज निर्मिती मिळते. हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील पाटण आणि चिपळूण तालुक्यातील पाटण तालुक्यात निर्माण झाला आहे. कोयना धरण जमिनीवर बांधलेला असला तरी येथील भौगोलिक रचनेचा फायदा घेवून डोंगराच्या पोटात आणि जमिनीच्या खाली कोयना प्रकल्प उभारण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने उभारलेला हा प्रकल्प महानिर्मिती कंपनीमार्फत चालविला जातो. प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी महानिर्मिती कंपनीने कोणत्या उपायोजना केल्या आहेत. त्याचा भारत सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरो या गुप्तचर संस्थेचे मार्फत दरवर्षी आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवर आयबीचे पथक बुधवारपासून या प्रकल्पाच्या सुरक्षेचा आढावा घेत आहेत. कोयना प्रकल्पावर अतिरेकी हल्ला होऊ नये. मात्र झालाच तर तो कशाप्रकारे रोखता येईल यासाठी महानिमिर्ती कंपनीने केलेल्या सुरक्षेच्या उपायोजनांचा ही संस्था तीन दिवस आढावा घेणार आहे.

गेल्यावर्षी आयबीच्या पथकांनी कोयना प्रकल्पाची पाहणी करून काही उपायोजना सुचविल्या होत्या. त्याची अमलबजावणी झाली किंवा नाही याचा आढावा येथे दाखल झालेले पथक घेणार आहे. तसेच सुरक्षेबाबत नव्या उपायोजना सांगणार आहेत. महानिर्मिती कंपनीच्या भविष्यातील सुरक्षेबाबत कोणत्या योजना आहेत. त्याची माहितीही घेतली जाणार आहे.

इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने बुधवारी प्रथम महानिर्मिती कंपनीच्या पोफळी येथील कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर वीज निर्मिती करणाऱ्या चारही टप्यांची पाहणी करून नंतर कोयना धरणाची पाहणी केली जाणार आहे. इंटेलिजन्स ब्युरोला महानिर्मिती कंपनीच्या सुरक्षेबाबत माहिती देण्यासाठी मुख्यअभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारीही देण्यात आली आहे.