गुहागर:- तालुक्यातील तवसाळ येथे पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी, १५ जून रोजी घडली. संजोग शशिकांत सुर्वे (वय ३५ वर्षे, रा. पडवे भंडारवाडा, ता. गुहागर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी संजोग सुर्वे आपल्या मित्रांसोबत (निखिल सुर्वे, विनायक गडदे आणि अक्षय सुर्वे) तवसाळ परिसरात गेले होते. काही वेळ फिरल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर हे चौघे मित्र मौजे पडवे तवसाळ येथील महामाई सोनसाखळी गावदेवी मंदिरालगत असलेल्या खाडीत पोहण्यासाठी उतरले.
पोहताना संजोग सुर्वे हा अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला आणि बुडू लागला. हे पाहताच त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. यावेळी त्याच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. अक्षय सुर्वे याने त्याला कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु संजोगने कोणतीही हालचाल केली नाही.
त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून हेदवी येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्याला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, आबलोली आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून संजोग सुर्वे याला मृत घोषित केले. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी अकस्मात मृत्यू (आमृ. क्रमांक २३/२०२६) म्हणून बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे.









