दहा लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्तः खेड पोलिसांची कारवाई
खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हाकेम केमिकल कंपनीतून २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे चोरणाऱ्या संजय सितपराव (४०, रा. रायगड) याला येथील पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेली २० किलो वजनाची २२१ वजनमापे पोलिसांनी हस्तगत केली. वजनमापे वाहतुकीसाठी वापरलेला १० लाख रुपये किमतीचा मालवाहू टेम्पोही जप्त केला आहे.
एमआयडीसीतील दीपक नोव्हाकेम कंपनीतून २० किलो वजनाची आणि २ लाख ४५ हजार रुपये किमतीची वजनमापे चोरीस गेल्याची तक्रार एप्रिलमध्ये येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले तपास करत होते. पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस शिपाई विजेंद्र सातार्डेकर यांनी चोरीचा छडा लावण्यासाठी कंबर कसली होती.
साऱ्या शक्यतांचा पडताळा करत अखेर वजनमापे चोरणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून २० किलो वजनाची २२१ वजनमापे आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेतील चोरट्याचा अन्य चोऱ्यांमध्ये सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.









