Saturday, June 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा

कुर्धे येथील दुर्घटनाग्रस्त पुलाची उच्चस्तरीय चौकशी करा

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची उबाठा शिवसेनेची मागणी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता केंद्रे यांना तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कुर्धे येथील नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू असताना काँक्रीटचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर कामासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया किंवा वर्क ऑर्डर नसताना संबंधित ठेकेदाराने काम सुरू केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदाराने कोणाच्या आदेशाने काम सुरू केले, याचा शोध घेण्यात यावा. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही मंजुरीपूर्वीच कामे सुरू करून निधी मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अशा बोगस व अॅडव्हान्स कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय या प्रकारात संबंधित अधिकारी सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, तसेच विनापरवाना काम करणाऱ्या ठेकेदाराचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी, “या दुर्घटनेतील दोषींवर योग्य ती कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.

निवेदनाची प्रत मा. कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कार्यालयालाही देण्यात आली. यावेळी शिवसैनिक सलील डाफळे, किरण तोडणकर, विजय देसाई, प्रसाद सावंत, साजिद पावसकर, अजिंक्य सनगरे आदी उपस्थित होते.