Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण करत बोटाचा लचका तोडला

चारित्र्याच्या संशयावरुन महिलेला मारहाण करत बोटाचा लचका तोडला

गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर येथील गुढेकरवाडी परिसरात झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने महिलेच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्याचा तुकडा तोडल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जून रोजी दुपारी सुमारे २.४५ ते ३ वाजण्याच्या दरम्यान गुढेकरवाडी, वेळणेश्वर येथे घडली. याप्रकरणी शालिनी शरद इतापे (वय ४५, रा. गुढेकरवाडी, वेळणेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी संदीप बाळू गुढेकर (वय ३५, रा. गुढेकरवाडी, वेळणेश्वर) हा मद्यधुंद अवस्थेत फिर्यादींच्या जवळ आला. त्यावेळी त्याने फिर्यादींना उद्देशून, ‘तुझा नवरा असताना तू दुसऱ्यासोबत का जातेस?’ असा जाब विचारला. त्यावर फिर्यादींनी, ‘माझा नवरा असताना मी दुसऱ्यासोबत कशाला जाईन?’ असे उत्तर दिले. या उत्तराचा राग आल्याने आरोपीने आक्रमक भूमिका घेत फिर्यादी, त्यांचे पती शरद भिकाजी इतापे तसेच शेजारी राजेंद्र संभाजी गुढेकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने तिघांनाही शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मारहाणीदरम्यान आरोपीने शालिनी इतापे यांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला चावा घेतल्याने बोटाचा काही भाग तुटून गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. घटनेनंतर शालिनी इतापे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ५०/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११७(२), ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.