Thursday, June 11, 2026
spot_img
Home गुन्हेगारी उत्पन्न लपवून घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल

उत्पन्न लपवून घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्रामपंचायत शिपायावर गुन्हा दाखल

चिपळूण:- खोटी माहिती देऊन आणि आपले उत्पन्न लपवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीच्या माजी शिपायावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिंग श्रीपत चव्हाण (रा. मार्गताम्हाणे खुर्द) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी मानसिंग चव्हाण हा मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ३१ जानेवारी २०२६ पर्यंत शिपाई पदावर कार्यरत होता. मे २०२१ ते २०२२ या कालावधीतील त्याचे प्रत्यक्ष उत्पन्न १,४७,१०९ रुपये इतके असतानाही, त्याने केवळ ६०,००० रुपयांचा उत्पन्नाचा दाखला मिळवला. या खोट्या दाखल्याचा वापर करून त्याने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचा लाभ घेतला. मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्याने घरकुल बांधून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याबाबत मनोहर शंकर गायकवाड (वय ५५, ग्रामपंचायत अधिकारी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ९ जून रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४) आणि भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.