Tuesday, June 9, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चुलतीवरील हल्लाप्रकरणी पुतण्याला अटक

चुलतीवरील हल्लाप्रकरणी पुतण्याला अटक

हर्णे बाजारपेठ येथील घटना

दापोली:- हर्णे बाजारपेठ येथे कौटुंबिक वादातून ७५ वर्षीय चुलतीवर दांडक्याने हल्ला केल्याप्रकरणी पुतण्या शिवसागर सुरेश भंडारे (वय ३५) याच्याविरूद्ध हर्णै सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शुक्रवारी दुपारी जयश्री रमेश भंडारे (७५) या घरात बसल्या असताना शिवसागर भंडारे हा दांडके घेऊन घरात घुसला. त्याने शिवीगाळ करत जयश्री भंडारे यांच्या डोक्यावर तसेच हात व कंबरेवर वारंवार प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेली त्यांची नातीलाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी जयश्री भंडारे यांच्यावर प्रथम दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यातः आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जयश्री भंडारे यांच्या फिर्यादीवरून संशयिताला अटक करण्यात आली.