Monday, June 8, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सव्वा कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बेड्या

रत्नागिरी सायबर पोलिसांकडून दिल्लीत कारवाई

रत्नागिरी:- बेंगलोर पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिल्ली (नोएडा) येथील एका संशयित आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. गगनदीप भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी यांचे माटुंगा (मुंबई) येथील कॅनरा बँकेत खाते आहे. आरोपींनी फिर्यादीला फोन करून त्यांचे खाते फ्रॉडमध्ये वापरले जात असल्याचे सांगून घाबरवले. तसेच, आपण बेंगलोर पोलीस व सीबीआय (नवी दिल्ली) अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीला ‘डिजिटल अरेस्ट’ केले. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी विविध खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादीची १ कोटी २३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०२/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाचे कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, रत्नागिरी सायबर पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत आणि बातमीदारांचे जाळे विणून नोएडा (दिल्ली) येथील गगनदीप भारद्वाजचा शोध लावला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्रीमती स्मिता सुतार, सपोनि तुषार जाधव, पोहवा संदीप नाईक आणि पोकॉ सौरभ कदम यांच्या पथकाने केली.

“कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा सीबीआय अधिकारी फोनवरून चौकशी करत नाहीत किंवा बँक खात्याची माहिती मागत नाहीत. कोणीही फोनवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन पैसे मागितल्यास घाबरून न जाता सावध राहा. अशा कॉल्सना बळी पडू नका आणि कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस विभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांनी केले आहे.