Monday, September 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार

लांजा वेरळ येथील थरारक घटना

लांजा:- लांजा तालुक्यातील वेरळ गावात पूर्ववैमनस्यातून एका प्रौढावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात प्रभाकर उर्फ भाई जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने अचानक कोयता हातात घेत प्रभाकर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. कोयत्याचे अनेक वार लागल्याने जाधव गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमी जाधव यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

या थरारक घटनेमुळे वेरळ गावासह परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.