फासकीत अडकून एकाचा अंत, तर दुसरा विहिरीत मृतावस्थेत आढळला
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात शनिवारी ३० मे रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने वन विभागासह परिसरात खळबळ उडाली आहे. मौजे तुरळ (हारेकरवाडी) येथे शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाला, तर मौजे मेघी (गावकरवाडी) येथे एका विहिरीत नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या दोन्ही प्रकरणांमध्ये वन विभागाने गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
तुरळ-हारेकरवाडी येथून माखजनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खैराच्या झाडाला लावलेल्या शिकारीच्या तारेच्या फासकीत अडकून एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. तुरळच्या पोलीस पाटलांनी वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीत बिबट्या फासकीत अडकलेल्या अवस्थेत मृत असल्याचे आढळले. वन विभागाने फासकीची तार आणि खैराच्या झाडाचा खुंट जप्त केला. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. कडवई येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सर्व अवयवांसह मृतदेहाचा नियमानुसार नाश करण्यात आला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात वन गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मेघी येथे विहिरीत मृतावस्थेत नर बिबट्या
दुसरी घटना मेघी गावकरवाडी येथे घडली. येथील रहिवासी सुरेश करंबेळे यांच्या मालकीच्या विहिरीत वन्यप्राणी पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता विहिरीतील पाण्यात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत तरंगताना आढळला. वन अधिकाऱ्यांच्या मते, बिबट्याचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा. कारण त्याच्या शरीरावरील कातडी गळून गेली होती तसेच अंगावर अळ्या पडलेल्या होत्या. स्थानिक साहित्याच्या साहाय्याने वन कर्मचाऱ्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक तपासणीत बिबट्याचे दात, नख्या आणि इतर सर्व अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले. देवरुख येथील तालुका लघु पशु चिकित्सक तथा सहाय्यक आयुक्त युवराज शेट्ये यांनी घटनास्थळी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून मृतदेहाचा नाश करण्यात आला. या प्रकरणी वनपालांनी वनप्राणी प्रथम गुन्हा नोंदवही क्रमांक १८/२०२६ अन्वये नोंद केली आहे.
दोन्ही घटनांची चौकशी रत्नागिरी विभागाच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनास्थळी परिक्षेत्र वनाधिकारी विक्रम गुरव, परिमंडळ वनाधिकारी सागर गोसावी यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
एका दिवसात तालुक्यात दोन बिबट्यांचे मृत्यू झाल्याने वन्यजीव संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, फासकीच्या घटनेमुळे बेकायदा शिकारीच्या प्रकारांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू केला असून मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.









