Monday, June 1, 2026
spot_img
Home राजकीय ‘कोकण’च्या जागेवरून महायुतीत बंडखोरी

‘कोकण’च्या जागेवरून महायुतीत बंडखोरी

आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी:- राज्यातील विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उघड संघर्ष पाहायला मिळत आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी शनिवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेने आपली कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केली होती. त्या बदल्यात शिवसेनेला परभणी-हिंगोलीची जागा मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, स्थानिक स्तरावर शिवसेनेच्या आमदारांचा या निर्णयाला तीव्र विरोध आहे. रायगडची जागा कोणत्याही परिस्थितीत तटकरेंना मिळू नये, असा आक्रमक पवित्रा स्थानिक नेते घेत आहेत.

शनिवारी जुईली दळवी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असून आमचा तटकरेंच्या कार्यपद्धतीला विरोध आहे. त्यांनी आमच्यावर कायम अन्याय केला आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाबद्दल विचारले असता, त्याबाबत नंतर निर्णय घेऊ असे सूचक विधान त्यांनी केले.

​या घटनेनंतर राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जुईली दळवी यांनी हा अर्ज का भरला, याबाबत मी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी चर्चा करेन. खुद्द महेंद्र दळवी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून मार्ग काढतील,” असे सामंत यांनी म्हटले आहे. मात्र, या बंडखोरीमुळे महायुतीमधील जागावाटपाचे समीकरण बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
​रायगडमधील या घडामोडींमुळे महायुतीमध्ये नक्की काय शिजतंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत हा तिढा सुटतो की बंडखोरी कायम राहते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.