Sunday, September 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला मारहाण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून वृद्ध महिलेला मारहाण

रिक्टोली खालचीवाडी येथील घटना

चिपळूण:- तालुक्यातील रिक्टोली (खालचीवाडी) येथे नळाला पाणी का आले नाही, अशी साधी विचारणा करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने अत्यंत निर्घृणपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात संबंधित मुजोर कर्मचाऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर घडली असून, याप्रकरणी २८ मे रोजी दुपारी १.०९ वाजता अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यात चंद्रकला चंद्रकांत सावंत (वय ६०) या वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मूळच्या रिक्टोली येथील रहिवासी असलेल्या चंद्रकला सावंत या सध्या नवी मुंबईतील घणसोली येथे राहतात. मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी त्या आपल्या कुटुंबासह गावी आल्या होत्या. मात्र, गावी आल्यापासूनच त्यांच्या राहत्या घराच्या नळाला पाणी येत नव्हते. घटनेच्या दिवशी सकाळी गावचा ग्रामपंचायत कर्मचारी आरोपी सुभाष सर्जेराव शिंदे (वय ५०, रा. रिक्टोली खालचीवाडी) हा त्यांच्या घरासमोरून जात असताना, चंद्रकला यांनी त्याला अडवून ‘नळाला पाणी कधी सोडणार आहेस?’ अशी विचारणा केली. सार्वजनिक पाणी पुरवठ्याबाबत विचारलेल्या या साध्या प्रश्नाचा आरोपी सुभाष शिंदे याला प्रचंड राग आला.

रागाच्या भरात त्याने ज्येष्ठ महिला असल्याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता चंद्रकला यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे, माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही,’ अशी अरेरावीची भाषा करत त्याने चंद्रकला यांच्या कानाखाली जोरदार थापड मारली. या अनपेक्षित प्रहारामुळे ६० वर्षीय चंद्रकला या चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्या खाली पडलेल्या असतानाही नराधम कर्मचाऱ्याचा राग शांत झाला नाही; त्याने थेट त्यांच्या मानेवर आपला पाय ठेवून त्यांना दाबले आणि स्वतःच्या हातातील लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला ठार मारून टाकीन,’ अशी जाहीर धमकी देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला.
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित वृद्धेने पोलिसांत धाव घेतली. शिरगाव पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी सुभाष सर्जेराव शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नंबर २८/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुट्ट्यांसाठी गावी आलेल्या मुंबईकर वृद्ध महिलेला एका शासकीय कर्मचाऱ्याकडून झालेल्या या मारहाणीमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.