Thursday, May 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूरच्या डॉक्टरला लांज्यातील तरुणाकडून गंडा

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत राजापूरच्या डॉक्टरला लांज्यातील तरुणाकडून गंडा

राजापूर:- इन्स्टाग्रामवरील ओळख आणि त्यानंतर नग्न फोटो शेअर करणे एका ३१ वर्षीय डॉक्टरला चांगलेच भोवले आहे. या फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून सव्वा दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या लांज्यातील एका तरुणाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना वडदहसोळ (ता. राजापूर) येथे उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१, रा. वडदहसोळ) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सन २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांची ‘नेहा बिराडी’ (आयडी: neha_biradi_03) या कथित महिलेशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत समोरच्या व्यक्तीने फिर्यादींना विश्वासात घेऊन त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो मिळवले.

काही काळाने सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) याने हेच फोटो हत्यार म्हणून वापरले. त्याने फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर संपर्क साधून ते नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने फिर्यादी घाबरले असता, आरोपीने त्यांच्याकडे २,२५,००० रुपयांची मागणी केली. यातील २५,००० रुपये फिर्यादी यांनी घाबरून आरोपीच्या खात्यावर ‘गुगल पे’ द्वारे ट्रान्सफर केले.

आरोपीची पैशांची हाव वाढतच गेल्याने अखेर डॉक्टर अक्षय म्हादये यांनी हिंमत दाखवून राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी २७ मे २०२६ रोजी रात्री ११.२१ वाजता गुन्हा दाखल केला.