Wednesday, May 27, 2026
spot_img
Home संगमेश्वर खोपीतून लाकडे काढताना सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू

खोपीतून लाकडे काढताना सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू

ताम्हाणे कुळ्येवाडी येथील घटना

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे कुळ्येवाडी येथे घराशेजारील खोपीतून जेवणासाठी लाकडे काढत असताना एका ७५ वर्षीय वृद्धेला विषारी सर्पाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे प्रकृती खालावल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या वृद्धेचा मृत्यू झाला. अनुसया लहु शिगवण (वय ७५, रा. ताम्हाणे कुळ्येवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास अनुसया शिगवण या आपल्या घराच्या शेजारी असलेल्या खोपीमध्ये नेहमीप्रमाणे जेवणासाठी लाकडे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या दरम्यान खोपीत दडून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला जबर दंश केला. हा प्रकार लक्षात येताच वाडीतील स्थानिक तरुण प्रथमेश प्रभाकर कानसरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने धाव घेत अनुसया यांना रिक्षातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल केले. मात्र, शरीरात विष भिनल्याने रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १६/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ताम्हाणे कुळ्येवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.