चिपळूण गोवळकोटमधील धक्कादायक घटना
चिपळूण:- अलीकडे युवकांमध्येही अकाली मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात गोळकोट येथे घडली आहे. मुंबईहून गावी आलेल्या तीस वर्षीय युवकाचा आकस्मित मृत्यू झाला आहे. पंकज नथुराम कदम (वय-३० वर्ष रा. गोवळकोट ढवळनाका चिपळूण ता. चिपळूण जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या पंकज याचा भाऊ राकेश कदम हाही मुंबई येथून गावी आला होता. राकेश हा सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त गावी आला होता. पंकज दुपारपासून घराच्या बाहेर पडला नव्हता. त्यामुळे राकेश याने पंकजला हाक मारली. मात्र त्याने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये पाहिलं असता पंकज हा टेबलावर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे सगळेच घाबरले होते. नेमकं काय झालं हे कोणाला कळत नव्हतं. अखेर पंकजला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पंकज काहीही बोलत नव्हता. त्याची हालचालही होत नव्हती. त्याला शनिवारी सायंकाळच्या सुमारास रिक्षाने तात्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कामथे येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
पंकज हा सुद्धा मुंबई येथे नोकरी निमित्त वास्तव्यास होता. मात्र तो अलीकडेच गावी आला होता. पंकज याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी व्हिसेरा तपासासाठी राखून ठेवला आहे. या प्रकरणाची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अविवाहित असलेल्या पंकज याच्या पक्षात तीन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास चिपळूणचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक करत आहेत.









