मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक ‘रिटर्न शॉक’ लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण खिकुराम पोमा (वय २५ वर्षे, रा. आसाम) असे मृत तरुणाचे नाव आहे. काम सुरू असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डीपी चालू केल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील रहिवासी असलेला उरण पोमा हा कुंबळे येथे वीज वितरणच्या कामावर होता. २१ मे रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो कुंबळे येथील एल.टी. वीजवाहक पोलवर चढून दुरुस्तीचे काम करत होता.
तो पोलवर काम करत असतानाच, कुंबळे दळवीवाडी बाजूकडील वीज वितरणची डीपी (रोहित्र) एका अज्ञात इसमाने अचानक चालू केली. त्यामुळे उरण याला पोलवरच विजेचा जोरदार ‘रिटर्न शॉक’ बसला. शॉक लागल्यामुळे तो थेट पोलवरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर त्याला तातडीने औषधोपचारासाठी मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला दाखल करण्यापूर्वीच ‘मयत’ घोषित केले. या धक्कादायक घटनेनंतर मंडणगड पोलीस ठाण्यात २१ मे २०२६ रोजी रात्री १०:३४ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
लाइनवर काम सुरू असल्याचे माहीत असतानाही दळवीवाडी बाजूची डीपी कोणी चालू केली? आणि या निष्काळजीपणाला कोण कारणीभूत आहे? याचा अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









