उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, ३ संशयित ताब्यात

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे (25,मुळ रा.नायरी संगमेश्वर सध्या रा.विरार मुंबई) या तरुणाचा अज्ञात कारणातून खून केल्याची घटना गुरुवार 21 मे रोजी रात्री 9.30 ते 10.53 वा. कालावधीत घडली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड,नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचाही पत्ता माहिती नाही) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. याबाबत सूरज झोरेची बहिण नंदा रमेश फाले (32,रा.राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग दहिसर,मुंबई) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा भाउ सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेला होता. गुरुवार 21 मे रोजी रात्री 9.30 ते 10.53 वा.कालावधीत साईनगर सात बंगल्याच्या मागे संशयित तिघांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर,हातांवर वार करुन त्याला जिवे ठारण्याच्या उद्देशाने गंभिर जखमी केले होते. सूरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना शुक्रवार 22 मे रोजी दु.2.30 वा.सुमारास सुरजचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.









