अपघात करून पळ काढणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी येथील रस्त्यावर डंपरने पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात सांगली येथील मोटारसायकल स्वार तरुण गंभीर जखमी झाला असून, अपघात केल्यानंतर जखमीला कोणतीही मदत न करता डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशीअंती याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास नाणीज धनगरवाडीसमोरील रोडवर झाला. सुमेध विजयसिंग चौहान (रा. विश्रामबाग, सांगली, ता. मिरज, जि. सांगली) हा तरुण आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक MH-42-BD-5557) घेऊन रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता.
त्याच वेळी समोरून जाणारा डंपर (क्रमांक MH-08-AP-5651) वरील चालक एम. डी. अस्लम अब्दुल रहमान (रा. मिर्झापूर, मुजफ्फरपूर, राज्य बिहार) याने कोणताही इशारा न देता आपले वाहन अचानक उजव्या बाजूला वळवले. डंपर चालकाच्या या निष्काळजीपणामुळे पाठीमागून येणाऱ्या सुमेधच्या मोटारसायकलला डंपरची उजव्या बाजूने जोरदार धडक बसली.
या धडकेमुळे सुमेध चौहान हा रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या शरीराला गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या, तसेच मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. मानवता दाखवून जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे किंवा पोलिसांना अपघाताची माहिती देणे आवश्यक असताना, आरोपी डंपर चालक अस्लम रहमान हा अपघातानंतर घाबरून वाहन आणि जखमीला तसेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मोटार अपघात रजिस्टर क्रमांक १९/२०२६ वरून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर २० मे रोजी रात्री १०.५१ वाजता पोलीस उपनिरीक्षक मोहन रामचंद्र कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ , १२५ (अ) , १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), (ब), १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









