चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बिअर शॉपीसमोर सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका चिकन दुकानदारावर चार अनोळखी इसमांनी बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाली येथे घडली आहे. या हल्ल्यात प्रशांत रमेश राऊत (वय ४८, रा. पाली, मराठवाडी, रत्नागिरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी प्रशांत राऊत हे आपल्या चिकनच्या दुकानात काम करत असताना, समोरील ‘समर्थ बिअर शॉपी’चे मालक राजेश सावंत आणि चार अनोळखी ग्राहकांमध्ये जोरदार भांडण सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रशांत यांनी तेथे जाऊन मध्यस्थी करत ते भांडण मिटवले.
यानंतर थोड्या वेळाने प्रशांत राऊत हे ‘राधिका चायनिज सेंटर’ येथे चायनिज आणण्यासाठी गेले होते. चायनिज पार्सल घेऊन ते आपल्या मोटरसायकलवर बसत असतानाच, बिअर शॉपीजवळ भांडण केलेल्या त्या चार अनोळखी इसमांपैकी एकाने मागून येऊन प्रशांत यांच्या डोक्यात आणि हातावर काचेची बिअरची बाटली जोरात मारली. त्याच वेळी उर्वरित तीन इसमांनी प्रशांत यांना बेदम धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला.
हा प्रकार सुरू असताना गावातील अविनाथ सावंत यांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली आणि प्रशांत यांची सुटका केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रशांत राऊत यांना उपचारासाठी तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी जखमींचे बंधू प्रसन्न रमेश राऊत (वय ३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी चार अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.









