महिला प्रवाशावर गुन्हा दाखल
मंडणगड:- मंडणगड एस.टी. स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाला महिला प्रवाशाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस सुटण्याच्या वेळेवरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वाहक हे नालासोपारा ते डौली या एस.टी. बसवर (क्र. MH 20 BL 3337) शासकीय कर्तव्य बजावत होते. १३ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही बस मंडणगड स्थानकात उभी होती. यावेळी आरोपी महिला प्रवाशी रिद्धी प्रफुल्ल लाड (रा. गवळवाडी कांगवाई, ता. दापोली) यांनी वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रवाशाचे सीट क्र. १९, २० आणि २१ वर रिझर्व्हेशन होते. बस कांदिवली समतानगर येथील थांब्यावर आली असता, या महिला प्रवाशी वेळेत तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे बस तिथून निघून आली. त्यानंतर या महिला प्रवाशी दुसऱ्या बसने (बोरीवली-दापोली) मंडणगड येथे पोहोचल्या आणि त्यांनी थेट कंट्रोल केबिनजवळ वाहकाला गाठून वाद घातला.
वाद सुरू असताना आरोपी महिलेने वाहकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. वाहक शासकीय गणवेशात आपले कर्तव्य बजावत असताना, महिलेने त्यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांच्या कानाखाली मारली. सार्वजनिक ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
याप्रकरणी संबंधित वाहकाने दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी आरोपी रिद्धी प्रफुल्ल लाड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.









