Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी पत्नीने पोलीसात तक्रार केल्याचा रागातून पतीनेच घर पेटवून दिले

पत्नीने पोलीसात तक्रार केल्याचा रागातून पतीनेच घर पेटवून दिले

खेड:- तालुक्यातील कोतवली येथे एका संतापजनक घटनेत, पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पत्नीने पतीच्या विवाहबाह्य संबंधांबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून हे कृत्य करण्यात आले. या आगीत घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, खेड पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. प्रियंका सचिन जुवळे (वय २६) आणि त्यांच्या सासूने आरोपी सचिन सत्यवान जुवळे याचे बाहेर असलेल्या प्रेमसंबंधांबाबत खेड पोलीस ठाण्यातील महिला कक्षात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महिला समुपदेशन केंद्राच्या विशाखा चव्हाण मॅडम यांनी आरोपी सचिन जुवळे आणि त्याची प्रेयसी शुभ्रा दिवेकर यांना चौकशीसाठी फोन करून बोलावले होते.

पोलीस ठाण्यातून आलेल्या या फोनचा सचिनला प्रचंड राग आला. याच रागातून प्रियंका यांचे कोतवली येथील राहते घर नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मंगळवार, १२ मे रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

​आरोपी सचिनने घरात शिरून कोणत्याही तरी ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने घराला आग लावून दिली. ही आग इतकी भीषण होती की, घराच्या छपरावरील सर्व लाकडी भाले जळून खाक झाले, ज्यामुळे छतावरील सर्व कौले खाली पडली. तसेच, घरातील सर्व गृहोपयोगी वस्तू जळून राख झाल्या आहेत. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही.

​या प्रकरणी प्रियंका जुवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी आरोपी पती सचिन सत्यवान जुवळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२६ (छ) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १३७/२०२६ नुसार दाखल केला आहे. रात्री १० वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.