Wednesday, May 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात ३८ हजार ग्रामस्थांना टँकरचा आधार

जिल्ह्यात ३८ हजार ग्रामस्थांना टँकरचा आधार

टंचाईत वाढ ; सर्वाधिक टँकर रत्नागिरी तालुक्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील पाणाटंचाईची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सहा तालुक्यातील ४८ गावातील ११६ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून त्याचा लाभ ३८ हजार ८४ ग्रामस्थ घेत आहेत. पुढील काही दिवसात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता आणखीन वाढेल, असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचना तालुक्यांना दिल्या आहेत.

मागील आठवड्यात जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती; परंतु पावसाचा जोर अधिक नव्हता. त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल झाला आणि उष्मा वाढला. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस कमाल पारा ३५ ते ३६ अंशाच्या दरम्यान आहे. वाढत्या उष्म्यामुळे दिवसेंदिवस विहिरींची पाणीपातळी खालावत आहे. परिणामी, टँकरने पाणीपुरवठ्यासाठी मागणी करणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यात टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. आतापर्यंत १ हजार २९६ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. १४ खासगी आणि ३ शासकीय टँकर दिमतीला आहेत. राजापूर, लांजा आणि गुहागर या 3 तालुक्यात अजूनही टँकर धावलेले नाहीत. राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये टँकरची मागणी झालेली होती; परंतु त्यांना टँकरऐवजी अन्य मार्गाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.