Monday, May 11, 2026
spot_img
Home लांजा लांजा आगरवाडीत वीज पडून घरातील साहित्य जळून खाक

लांजा आगरवाडीत वीज पडून घरातील साहित्य जळून खाक

बागायतींचेही मोठे नुकसान

लांजा:- शहरातील आगरवाडी येथे दिनांक 9 मे रोजी झालेल्या अवकाळी वादळी वारा व पावसादरम्यान वीज पडल्यामुळे प्रभाकर शांताराम गुंड्ये यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर तसेच इलेक्ट्रिक मीटर जळून खाक झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या दुर्घटनेत अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच घटनेची माहिती मिळताच लांजा तलाठी, नगरसेवक तसेच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. नुकसानग्रस्त प्रभाकर गुंड्ये यांनी शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना प्रभाकर गुंड्ये म्हणाले की, “सन 1997 साली देखील आमच्या घरावर अशाच प्रकारे वीज पडून मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा त्याच प्रकारची घटना घडल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.”

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे व वीज पडल्याच्या घटनेनंतर संपूर्ण लांजा शहरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. संबंधित यंत्रणेकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.

तसेच आगरवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, फणस व नारळाच्या झाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या असून काही झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वीजपुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी आगरवाडी येथील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. रस्त्यावर व वीजवाहिन्यांवर पडलेली झाडे व फांद्या हटविण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत झाडे तोडून मार्ग मोकळा केला. ग्रामस्थांचे वीज यंत्रणेला सहकार्य मिळाल्याने वीज जोडण्याचे काम जलद गतीने करता येणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले.