Monday, May 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी वादळाचा मोठा फटका; साडेतीनशे घरांसह गोठे, इमारतीचं नुकसान

वादळाचा मोठा फटका; साडेतीनशे घरांसह गोठे, इमारतीचं नुकसान

नुकसानीचा आकडा 50 लाखांहून अधिक,
महावितरणला 80 लाखांचा फटका

रत्नागिरी:- वादळासह काल पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. सहा तालुक्यातील साडेतीनशे घरांसह गोठे, शासकीय इमारतींचे मिळून सुमारे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर वेगवान वाऱ्यामुळे विजेचे खांब, वाहिन्या तुटून गेल्यामुळे महावितरणला ८० लाखाचा फटका बसला आहे. संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावातील विजपुरवठा अजूनही खंडीतच आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच रत्नागिरीचा राजा हापूस आंब्यालाही तडाखा बसला आहे. लाखो रूपयांचा आंबा गळून गेला आहे.

शनिवारी सायंकाळी अचानक वेगवान वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याचा पावसाचा सर्वाधिक फटका घरांना आणि महावितरणच्या वीज यंत्रणेला बसला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये महावितरणचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले असून, शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. तर विविध तालुक्यांत अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांची हानी झाली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या पायाभूत सुविधांची मोठी पडझड झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, उच्चदाब वाहिनीचे १०८ आणि लघुदाब वाहिनीचे २३५ असे एकूण ३४३ वीज खांब कोसळले आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीजवाहिन्या तुटून पुरवठा खंडित झाला आहे. पाऊस ओसरल्यानंतर महावितरणने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, २० ठेकेदार आणि १५० कामगार युद्धपातळीवर काम करत आहेत.

जिल्ह्यात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत घरांचे आणि गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छतावरील पत्रेच्या पत्रे वाऱ्याबरोबर उडून गेले. रत्नागिरी शहराजवळील मिरकरवाडा बंदरातील स्थिती भयानक होती. लोखंडी पत्रे पाला-पाचोळ्यासारखे उडून जात होते. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. राजापूर तालुक्यात सर्वाधिक ७३ घरे आणि गोठ्यांचे १७ लाख १९ हजाराचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील २४ घरांसह १ अंगणवाडी आणि २ शासकीय इमारतींचे मिळून सुमारे १५ लाख, मंडणगड तालुक्यातील ११७ घरांचे ५ लाखांचे, संगमेश्वर तालुक्यातील ११ घरांना फटका बसला असून ५ लाख २८ हजारांचे नुकसान झाले आहे. चिपळुणात ३८ घरांचे २ लाख ३४ हजारांचे अंशतः नुकसान झाले. दापोलीसह लांजा तालुक्यातही नुकसान झाले असून पंचमाने सुरू आहेत.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले असले, तरी दुर्गम आणि ग्रामीण भागातील काम अद्याप सुरू आहे. महावितरणची पथके अहोरात्र राबून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या आपत्तीच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.